Monday, November 1, 2010

लक्ष्मीचा जन्म

kanchan athalye | Monday, November 01, 2010 | Best Blogger Tips

देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या विषाच्या ज्वाला एवढ्या तीव्र होत्या की त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठात धारण केल्या. मंथनात चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.

या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीचा आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूप्रिया, विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाऊ लागले. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे. लक्ष्मीचा रंग गोरा आणि चार भुजा आहेत. तिने किरीट मुकूट आणि दिव्य वस्त्रालंकार धारण केले आहेत. लोक तिला ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानतात. घुबड हे तिच्या वाहनाच्या रूपात आहे. ती स्वभावाने अतिशय चंचल आहे.

कमल थिर न रहीम कही यही जानत सब कोय।
पुरूष पुरातन की वधु क्यूं न चंचला होय।।

लक्ष्मी कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. परंतु, ती विष्णू पत्नी असल्यामुळे विष्णूच्या आराधनेबरोबर तिचीही नियमीतपणे आराधना केली जाते. तिथे ती स्थिर रूपात निवास करते. तिचे आसन कमळ असल्यामुळे तिला कमला किंवा कमलासना असेही म्हटले जाते. कार्तिक कृष्णा अमावस्येला ‍दीपावलीच्या रात्री महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी विशेष रूपात विश्वभ्रमणासाठी निघते. महालक्ष्मीची उपासना केल्यामुळे दु:ख, दारिद्रयापासून मुक्ती मिळून ऐश्वर्य प्राप्त होते.

लक्ष्मीची उत्पत्त‍ी आणि निवास

एकदा सूताने ऋषींना विचारले की, 'प्रभू! विष्णूने अलक्ष्मीची उत्पत्ती का आणि कशा प्रकारे केली? हे आम्हाला समजावून सांगा' त्यावर सुत म्हणाले की, विष्णूने जगाला आकर्षित करण्यासाठी आपल्या एका भागापासून श्रेष्ठ पद्या (श्री) आणि दुसर्‍या भागापासून अशुभ परंतु ज्येष्ठ अलक्ष्मीला उत्पन्न केले. या अलक्ष्मीची उत्पत्ती वेदविरोधी अधर्मीयांना शिक्षा करण्यासाठी केली आहे. तिच्याशी विष्णूने विवाह केला परंतु तिच्या चंचल, अपवित्र आणि द्वेषभावनेमुळे ते दु:खी झाले होते.

तिच्या निवासाविषयी त्यांनी सांगितले आहे की,ज्या घरात पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात आहेत. गाय, गुरूजन आणि पाहुण्यांचा आदर करत नाहीत. ज्या घरात महादेवाची निंदा केली जाते. यज्ञ, जप, तप, व्रत, होम इत्यादी केले जात नाही. ज्या घरात रात्रंदिवस भांडण असते. अतिथी, वैष्णव, गुरू आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्या जात नाही. ज्या घरात चांगला आचार-विचार नाही.

देवाला नैवैद्य न दाखविता, यज्ञ-हवनाशिवाय भोजन केले जाते. ज्या घरातील लोक मूर्ख, क्रूर, निर्दयी, पापी आणि नेहमी एकमेकांच्या विरोधात असतात. ज्या घरात पत्नी स्वेच्छेने काम करणारी, स्वछंदी पु‍त्र, निरंकुश असतो. ज्या घरातील लोक संध्याकाळी मैथुन करण्यासाठी प्रवृत्त होतात. ज्या घरातील पुरूष पाण्यात मैथुन करतात. ज्या घरात कन्यांचा विक्रय केला जातो आणि मद्यपान केले जाते. ज्या घरात पूजा करण्याअगोदर मैथुन, जुगार किंवा मद्यपान केले जाते. जेथे नेहमी भांडणे होतात, स्वयंपाकघरात भेदभाव केला जातो. जेथे धर्म, बल, शील नसते. जो मनुष्य दुसर्‍याच्या अंथरूणावर जाऊन झोपतो, दुसर्‍याचे अन्न खातो. जो मनुष्य अपवित्र असतो, अस्वच्छ कपडे घालतो, दात साफ करत नाही, सकाळी व संध्याकाळी झोपतो. थोडक्यात म्हणजे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन कुटूंब हेच अलक्ष्मीचे योग्य निवासस्थान आहे.

लक्ष्मीच्या निवासाविषयी ओळख करून देत असताना सूत ब्रह्माने वशिष्ठाला सांगितलेले विवरण लोकहितासाठी येथे सांगतात. लक्ष्मी आपल्याकडे नित्य राहण्यासाठी मन, वचन आणि कर्माने पुण्यवान असले पाहिजे. रात्रंदिवस 'नमो नारायण' या मंत्राचा जप केला पाहिजे. स्वत: नारायणाला समर्पित करून कर्म करणार्‍या आणि सर्व कर्माचे फळ श्री नारायणाला समर्पित करणार्‍याची सर्व पापांपासून मुक्तता होऊन त्याला परमगती प्राप्त होते.

अशा प्रकारे लक्ष्मीच्या कृपेसाठी नारायणाची आराधना-पूजा करणे हाच एकमेव पर्याय आहे. 'नमो नारायण' किंवा 'नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचे महात्म्य अवर्णनीय आहे. या मंत्राचा जप केल्यावर केवळ लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे नाही तर सर्व अभिष्टांची सिद्धी प्राप्त होते.

Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...



Stumble Upon Toolbar

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!