Tuesday, November 2, 2010

नऊवारी साडी

kanchan athalye | Tuesday, November 02, 2010 | Best Blogger Tips
भारतीय संस्कृती ही विश्वातील काही प्राचीन संस्कृतींपैकी एक. वेशभूषा आणि अलंकारांची विशेष आवड असणा-या भारतीयांसाठी, साडी हा महत्त्वाचा पेहराव आहे. असे मानले जाते साडीचे आगमन पाच हजार वर्षांपूर्वी झाले. काळानुसार, जीवनशैली आणि प्रदेशांनुसार साडी नेसण्याच्या पध्दतीत बदल होत गेले. साडीच्या बरोबरीने अनेक पेहराव आले, फॅशन बदलल्या तरी साडीचे अस्तित्व आजही टिकून आहे. वैश्विक बदलांमधे अनेक जीव, वस्तू, वास्तू लोप पावल्या, काळाच्या ओघात काही टिकल्या तर काही नवीन रुपात सामो-या आल्या. साडी ही त्यापैकीच एक. 'साडी' हा शब्दाचा उगम 'सत्तिका' या प्रक्रित शब्दापासून तयार झाला तर काहींमते 'चीरा' (कापड) ह्या संस्कृत शब्दापासून झाला. हडप्पा संस्कृतीत बायका व पुरुष, दोघेही धोतर नेसत आणि बायका त्याच कापडाचे एक टोक शरीराचा वरचा भाग व डोके झाकयला घेत. सध्या पाचवारी साडया प्रचलीत आहेत. ह्या साडया प्रसंगानुसार विविध पध्दतीने नेसल्या जातात. आतातर डिसायनर साडयाही बाजारात उपलब्ध आहेत.
भारतात साडी नेसण्याच्या साधरणपणे १०-१५ विविध पद्धती आहेत. प्रत्येक प्रांत आणि भाषेप्रमाणे साडी नेसण्याची पध्दती बदलत जाते. नऊवारी साडी हे महाराष्ट्राचे वैशिष्टय, लाल काठ आणि पांढरया रंगाची साडी, त्यावर फ्रीलचे ब्लाऊज हे बंगाली बहूच नेसणार, कांजीवरम सोनेरी काठ असणा-या रेशमी साडया दक्षिणेची खासीयत, बांधणी नेसणारी डोक्यावर घेणारी मारवाडी नववधू, त्याउलट साडीला फक्त गुंडाळून घेणा-या आदीवासी स्त्रिया .... साडयांची ही कितीतरी विविध आणि वैशिष्टयपूर्ण रुप. साडयांचे रंगही प्रसंगानुरुप ठरवले गेलेले आहेत. लाल, हिरवा रंग नववधूसाठी, पूर्वी शांत आणि सौम्य रंग खानदानी स्त्रियांसाठी, भगवा रंग साधवींसाठी तर पांढरा रंग विधवांसाठी. काळानुसार विचार बदलत गेले आणि आपल्या आवडीप्रमाणे साडयांचे रंग घेण्याकडे स्त्रियांचा कल वाढू लागला.

महाराष्ट्राची पारंपारिक साडी आहे नऊवारी. आजच्या आधुनिक काळात पाचवारी साडया वापरायला सोयीच्या असल्या तरी पण महाराष्ट्रातल्या गावांमध्ये आणि अपवादाने शहरांमधेही प्रौढ स्त्रिया नऊवारी साडयाच नेसतात. किंबहूना तरुण मुलीही मंगळागौरींना, लग्नात, मुंजीत अगदी कॉलेजच्या 'साडी डे' ला ही ठेवणीतली आजीची जुनी पण खास नऊवारी साडी नेसतात. अशी ही नऊवारी साडीची जादू वर्षानूवर्ष टिकून आहे.
'नऊवारी' चा शब्दशा अर्थ आहे नऊ-वार सलग कापड. न शिवलेले/कापलेले सलग कापड पुराण काळात अतिशय पवित्र मानले गेले आहे. हे कापड सुती, रेशीम असे विविध पोत आणि विविध रंगात असणारे असते. नक्षीकामाने पदर आणि काठाचे सौंदर्य अधिक उठून दिसते. राजा-महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नक्षीकाम केले जायचे. नऊवारी साडीच्या आत परकर घालावा लागत नाही, नऊवारीचा खालचा भाग धोतरासारखा असतो. शारीरिक काम करण्यसाठी नऊवारी नेसणे सोयीचे होते. इतिहास जागवणा-या राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई, ह्या नऊवारीतच वावरल्या, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी ह्यांनी आपल्या कार्याचा प्रसार नऊवारी नेसूनच केला. त्या काळी बायका ही साडी घट्ट नेसून पोहायलाही जायच्या! अर्थात, त्या काळात पोहण्याचा पोशाख घालायला परवानगी नव्हती. आजही शेतात काम करणारया बायकां, मजूर आणि आपल्या घरातली आजी (अपवादाने) सुध्दा नऊवारीत असते की.

ही नऊवारी साडी नेसायची कशी? धोतर व नऊवारी नेसण्यात खूप साम्य लक्षात येईल. साडीचा मध्य दोन भागात घडी करून काढायचा. मग तो मध्य मागे कंबरेवर ठेऊन साडीची दोन टोकं पुढे आणायची. त्यांची पोटावर घटट गाठ मारायची. त्यानंतर ती दोन्ही टोके पायांमधून काढून उजव्या टोकाला नि-या घालून पाठीमागे कंबरेत खोचून द्यायचे. डाव्या टोकाला पायाभोवती घेऊन उजव्या खांद्यावर पदरासारखे टाकायचे. झाली नेसून नऊवारी ! हल्ली तरुणींना नऊवारी नेसणे एक आव्हान झाले आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून बाजारात आयत्या शिवलेल्या साडया उपलब्ध आहेत.

असे म्हणतात, एकोणीसव्या शतकातले प्रतिभावंत चित्रकार राजा रवी वर्मा, हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी स्त्रियांच्या उत्कृष्ट वस्त्राच्या शोधात होता. अखेर त्यांनी नऊवार साडी पसंत केली, कारण हीच एक अशी साडी होती जी कुठल्याही आकाराच्या शरीराला शोभून दिसू शकत होती. त्यामुळेच कदाचित राजा रवी वर्माच्या सर्व चित्रांमधल्या देवतांनी नऊवारीच नेसल्या आहेत !

Stumble
Delicious
Technorati
Twitter
Digg
Facebook
Reddit
Feed

If you like this please Link Back to this article...



Stumble Upon Toolbar

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

TOP
To Get Latest Update Subscribe Now !!!